हैद्राबाद : आंध्र प्रदेशमधील अल्लूरी सीताराम राजू जिल्ह्यात शुक्रवारी (१२ डिसेंबर) पहाटे भीषण अपघात झाला आहे. चित्तूर जिल्ह्यातील प्रवाशांना घेऊन निघालेली एक खासगी बस अल्लूरी सीताराम राजू जिल्ह्यातील मरेडुमिल्ली घाटातून जात असताना पहाटे ५.३० च्या सुमारास हा अपघात झाला. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळली. बसमधून एकूण ३७ जण प्रवास (३५ प्रवासी, एक चालक व एक क्लीनर) करत होते. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असून २३ जण जखमी झाले आहेत.
बस दरीत कोसळल्यानंतर स्थानिक गावकर्यांनी मदतकार्य सुरू केलं, त्याचबरोबर या अपघाताबाबत पोलिसांना माहिती दिली. काही मिनिटांनी चिंतूर पोलीस, बचाव पथक व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी बचावकार्य सुरू केलं. बचावकार्य अजूनही चालू आहे.
अपघातात १० जणांचा मृत्यू
बचाव पथकाने बसचा काही भाग कापून आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढलं. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना घटनास्थळापासून १५ किलोमीटर दूर सीएचसी चिंतूर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथे त्यांच्यावर उपचार केले जात आहे. प्रशासनाने सांगितलं की जखमींची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना भद्राचलम येथील रुग्णालयात हलवलं जाईल, जेणेकरून त्यांना अधिक चांगले उपचार मिळतील.
या अपघाताविषयी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बसमधील प्रवासी हे भद्राचलम मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आले होते. तिथून ते अन्नवरमला जात होते. या समुहाने चित्तूरमधून बस भाड्याने घेतली होती. ही ३५ सीटर बस पूर्णपणे भरली होती. ही बस मरेडुमिल्ली घाटातून जात असताना एका वळणावर चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस थेट दरीत कोसळली.